UPSC ते वकिली व्हाया - चाणक्य मंडल परिवार - व्हाया ज्ञानप्रबोधिनी
Turning Points of Life
गोष्ट पहिली - १० वी च्या प्रिलीमची तयारी ते आयुष्याची प्रिलीमची तयारी
मी पुण्यातलं लॉ च शिक्षण पूर्ण करून कर्जतला येऊन राहायला आता एक वर्ष होईल. इकडे आल्यावर खूप लोकांना भेटलो , खूप लोकांना खूप प्रश्न होते , हा आता इकडं कसा ! हा पुण्यात नेमकं करायचा काय आणि आता इकडे येऊन काय करणार ? हे सगळे खरेतर अंगावर येणारे प्रश्न , पण अशा प्रश्नांना उत्तर कशी द्यायची एवढं मात्र पुणे शहराने नक्की शिकून पाठवलं! ( Background मधले डायलॉग- रूको जरा !! सब्र करो !)
या प्रश्नांची उत्तर शोधताना गेल्या ८-९ वर्षांची स्वतःचीच स्वतःच्या मनामध्ये असणारी शॉर्टफिल्म तयार झाली. तीच शॉर्टफिल्म तुमच्यासमोर हळूहळू मांडतोय. या शॉर्टफिल्ममध्ये माझा UPSC कडे सुरू होणारा प्रवास - व्हाया चाणक्य मंडल - व्हाया ज्ञानप्रबोधिनी करत वकिलीकडे कसा झाला हे सगळं सांगणार आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात, अशा काही घटना घडतात की त्याचं संपूर्ण जीवनच बदलवून टाकतात.माझ्या आयुष्यातसुध्दा अशा काही घटना घडल्यात. एखाद्याचं बोलणं आपल्या आयुष्याला एक वेगळचं वळण देऊ शकतं यावर खरं तर माझा विश्वास नव्हता; पण गेल्या काही वर्षांत असं मी अनेकदा अनुभवलयं.
फेब्रुवारी २०१५ मधील तो दिवस मला लख्ख आठवतोय ज्याने माझ्या आयुष्याला वेगळं वळण दिलं. १० वीच्या प्रिलीम परीक्षेतील गणिताच्या पेपरच्या बरोबर एक दिवस आधी देशमुख मॅडमनी सांगितलं," सुमित उद्या एक व्याख्यान आहे आणि ते ऐकायला तूला यायचयं". यायचय म्हटलं की यायचं असतं विषय कट ! ( खरतरं आयुष्याच्या परीक्षांच्या प्रिलीमची तयारी या व्याखानातून होणार होती.)
दुसऱ्या दिवशी व्याख्यान ऐकायला.
सुरूवातील वीर सावरकरांनी लिहिलेलं 'जयोस्तुते जयोस्तुते' या गाण्याने कार्यक्रम सुरू झाला. आमच्या शाळेतील मुलांनी गाणं एवढं उत्तम गायलं होत की संपूर्ण वातावरण पूर्णतः स्तब्ध झालं होत, अंगावर अक्षरक्षः काटा उभा राहिला होता. लतादीदींनी ते गाणं एकलं असतं तर त्यांनीसुध्दा दाद दिली असती.
व्याख्यान देण्यासाठी आलेले प्रमुख वक्ते उभे राहिले आणि व्याख्यान देण्यासाठी व्यासपिठाकडे निघाले. धिप्पाड देह , चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास आणि प्रसन्नता ! एखाद्या माणसाच्या फक्त उपस्थितीनेच आजूबाजूचं वातावरणामध्ये प्रचंड उर्जा संचारते याचा अनुभव मी घेत होतो.
या माणसाचं नाव 'अविनाश धर्माधिकारी' ! सिर्फ नाम ही काफी है ! ( पुढे आम्ही ज्ञानप्रबोधिनी मध्ये सगळे त्यांना प्रबोधिनी स्टाईलप्रमाणे "अविदा" म्हणायलो लागलो.)
सरांनी बोलायला सुरू केलं, विषय होता 'विज्ञान आणि अध्यात्म '. सरांनी दोन तासाच्या बोलण्यामध्ये भारतातील प्राचीन वैज्ञानिक विचार ते आधुनिक प्रगत विज्ञान आणि विवेकानंद ,भारतीय अध्यात्म असा विस्तीर्ण पट अगदी ओघवत्या शब्दामध्ये सर्वांसमोर मांडला ! मी तिथचं या माणसावर फिदा झालो.
ठरलं ! आता हा माणूस सांगेल त्या पध्दतीने आपल्या जीवनाची दिशा ठरवायची !
आणि दहावीची परीक्षा संपल्या संपल्या अविनाश धर्माधिकारी सरांच्या यूट्युबवर असणाऱ्या सर्वच्या सर्व व्हिडिओज यांची पारायणं केली. 'स्व ची ओळख , उत्तमता आणि प्रतिभा , स्वाध्याय आणि योग, सुवर्णयुगाच्या स्वप्नांसाठी , कारगिल आणि युध्दाच्या गोष्टी ,मेईजी पुनःस्थापना , ऑपरेशन एन्टेबी , किती किती नावं घेऊ!! प्रचंड वेगवेगळे विषय , प्रचंड अभ्यास !!
हे सर्व ऐकताना मन अगदी थक्क व्हायचं !
हे सर्व मी नोकियाच्या डब्बा मोबाईल वर ऐकायचो ! या वेडापायी २०१६ मध्ये इंटरनेटच बिल तब्बल अडीच हजार इतकं आलं होत आणि त्यावरून प्रचंड बोलणं ऐकायला लागलं पण ते अडीच हजार सार्थकी लागले.
या सगळ्या प्रवासात पाऊलं नकळतच UPSC च्या वाटेकडे वळली. मी सायन (मुंबई ) येथे चाणक्य मंडल परिवार येथे फाऊंडेशन कोर्सला प्रवेश घेतला आणि नवीन प्रवास सुरू झाला.
क्रमशः
( पुढील भागात - चाणक्य मंडल परिवारातील एक अफलातून वर्ष)
ओघवते निवेदन, पुढचा भाग वाचायची उत्सुकता फार ताणू नकोस
ReplyDelete